Ad will apear here
Next
आनंदाचा झुळझुळता झरा - आसूदबाग
केशवराजचं डोंगराच्या कुशीतलं आखीवरेखीव मंदिर

बाळगोपाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, की घरातल्या सर्वांनाच वेध लागतात ते फिरायला जाण्याचे. हा ट्रेंड आता फक्त मामाच्या गावाला जाण्याइतकाच मर्यादित राहिलेला नाही. थोडी वेगळी ठिकाणं पाहायला जाण्याचं, मनसोक्त भटकंती करण्याचं प्रमाण आता वाढीला लागलं आहे. तसंच पर्यटनाचा कालावधी केवळ उन्हाळ्याच्या सुट्टीपुरताच मर्यादित राहिलेला नाही. वर्षाच्या कोणत्याही कालावधीत तीन-चार दिवस निवांत मिळाले, तर निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन मोकळा श्वास घेण्यासाठी अनेक जण आतुर असतात. म्हणूनच अशा काही वेगळ्या ठिकाणांची माहिती देण्यासाठी आमचं हे विशेष सदर...
‘चला, भटकू या’
......................
माडा-पोफळांच्या बनातून जाणारी रम्य पायवाट
दापोली आणि आंजर्ले परिसर आणि तिथल्या काही ठिकाणांचा फेरफटका मारल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की हा भाग अगदी तस्साच आहे...श्री. ना. पेंडशांच्या कादंबऱ्यांमध्ये भेटलेला. तीच माडा-पोफळांची बनं, तोच आल्हाददायक समुद्रकिनारा, तेच साकव, तोच गारवा आणि तीच शांतता. पेंडशांच्या कल्पनेतली ‘गारंबी’ ती अशीच कुठलीतरी. आता पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे काही ठिकाणचा बजबजाट वाढला आहे, एवढंच. दापोलीला जायचं, तर कर्दे, मुरुड हे प्रसिद्ध किनारे आहेतच; पण अगदीच निवांत आणि शांत ठिकाण हवं असेल, तर लाडघरला पर्याय नाही. इथलं जवळचं परशुरामाचं मंदिर, हर्णैमधला संध्याकाळचा समुद्रकिनाऱ्यावरचा मासळीचा बाजार, आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती ही ठिकाणं तर छान आहेतच; पण अगदी वेगळा आणि प्रसन्न अनुभव घ्यायचा असेल, तर आसूदबागला भेट द्यावी. आसूदबाग हे एकदम आडवाटेवरचं, शांत आणि निवांत ठिकाण आहे.

जंगलातली ही चढण दमछाक करणारी असली, तरी आल्हाददायक वातावरणामुळे प्रवास मजेचा होतो.दापोलीहून आंजर्ल्याच्या रस्त्याला लागलं, की चार-पाच किलोमीटवर उतारावरच आसूदबागेची पाटी दिसते. बरोबर गाडी असेल, तर उताराच्या शेवटी एक वळण घेऊन थोडं आतपर्यंत जाता येतं. नसेल, तर मुख्य रस्त्यावरच उतरून आणखी छोटीशी उतरंड पार करून गेलं, की आपण आसूदबागेच्या प्रवेशद्वारापाशी म्हणजे दाबकेवाडीत पोहोचतो. इथलं पोफळींचं बन आणि पाटातून वाहणारं झुळझुळ पाणी सगळ्यात आधी आपलं लक्ष वेधून घेतं आणि मन प्रसन्न करतं. छान सारवलेली अंगणं, कोकणी पद्धतीची कौलारू घरं, अंगणात घातलेली वाळवणं आणि या सगळ्या वातावरणात भरून राहिलेला गारवा. आसूदबाग म्हणजे आनंदाचा झुळझुळता झरा आहे. रस्त्यावरून आपण या पोफळींच्या प्रदेशात आत शिरतो, तेव्हा टुमदार घरांच्या अंगणांमध्ये वेगवेगळ्या कोकणी मेव्यांचे स्टॉल थाटलेले दिसतात. इथे चिंचा, आवळे, आंबा, फणस, करवंद, जांभळं, यांची सरबतं, साटं, आटवलेला रस, लोणची, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, कुरडया अशा असंख्य प्रकारांची रेलचेल असते. उन्हाळ्यात गेलं, तर आंब्या-फणसांचा मनमुराद आस्वादही घेता येतो. कोकम किंवा आवळा, जांभूळ, करवंदाच्या सरबताचा आस्वाद घेऊन पुढच्या वाटेने रवाना व्हायचं. ही वाट अशीच पोफळीच्या गारव्याच्या सोबतीने जाणारी. अतिशय शांत आणि निवांत. पक्ष्यांची किलबिल ऐकत, बाजूनेच वाहणाऱ्या नदीचा खळखळाट कानांत साठवत पुढे निघायचं. मध्येच भारद्वाजचा आवाज, कोकिळेचं कूजन, खंड्याचा किलबिलाट, सुतारपक्ष्याची टकटक, असा वेगवेगळ्या ध्वनींचा संगीतसोहळा अनुभवता येतो. 

मंदिराच्या दारात बाराही महिने गोमुखातून गार पाण्याचा झरा वाहत असतो.आणखी पुढे गेल्यावर दगडांच्या पायऱ्यांचा एक मस्त उतार दिसतो. तो उतरून थोडं पुढे गेलं, की समोरच या जंगलातला गारवा टिकवणारी छोटीशी नदी लागते. तिच्यावरचा जुना साकव आता पडलाय, त्यामुळे तिथे एक लोखंडी पूल बांधण्यात आला आहे. थोडा वेळ नदीत मस्ती करायची आणि पूल ओलांडून नदीपार व्हायचं. इथून पुढे जंगलातली एक मोठी चढण सुरू होते. बऱ्यापैकी दमछाक करणारी असली, तरी चांगल्या पायऱ्या, भरपूर सावली यामुळे हा प्रवासही मजेचा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत गेलो, तर वाटेत कैऱ्या, करवंदांचा कोकणी मेवाही चाखता येतो.

झऱ्याच्या उगमापासून दगडी पाट काढून त्याला खाली देवळापर्यंत आणण्याची केलेली व्यवस्था लक्ष वेधून घेणारी आहे.थोडंसं पुढे गेल्यावर डाव्या हाताला केशवराजचं डोंगराच्या कुशीतलं मंदिर दिसू लागतं. मंदिरापर्यंतचा हा प्रवास मजेचा असल्यामुळे, फारसा त्रास होत नाहीच. तरीही झालाच, तर मंदिराच्या दारात गार पाण्याचा एक बारमाही झरा आपला सगळा थकवा पळवून लावण्यासाठी सज्ज असतो. गोमुखातून येणारं हे थंडगार पाणी मनाला आणि शरीराला तृप्त करतं. केशवराज म्हणजे विष्णूचं हे मंदिरसुद्धा अगदी आखीवरेखीव आहे. या भागात फारशी वर्दळ नसल्यामुळे आणि चारही बाजूला जंगल असल्यामुळे देवळात काही क्षण बसलं, तरी मनाला अतिशय प्रसन्न वाटतं. नुसतं डोळे मिटून बसण्यानंही सगळा ताण, सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. केशवराज मंदिराच्या दारात येणारा हा झरा डोंगराच्या थोड्या वरून उगम पावतो. थोडा जास्त उत्साह असेल, तर आणखी थोडा डोंगर चढून जाऊन झऱ्याचा हा खाली येण्यापर्यंतचा प्रवासही पाहता येतो. झऱ्याच्या उगमापासून दगडी पाट काढून त्याला खाली देवळापर्यंत आणण्याची केलेली व्यवस्था लक्ष वेधून घेणारी आहे.

आजूबाजूला आणखी काय?
हर्णैचा किनारा (फोटो सौजन्य : विकिमॅपिया)संध्याकाळची मजा द्विगुणित करण्यासाठी दापोलीतले अनेक समुद्रकिनारे भरपूर सुविधांनी सज्ज आहेत. मुरूड, कर्दे यांसारख्या किनाऱ्यांवर पॅरासेलिंग, स्पीड बोट, तसंच इतरही अनेक साहसी खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत. पहाटेच्या वेळी होडीतून खोल समुद्रात जाऊन डॉल्फिनचं दर्शनही घेता येतं. सुरक्षेबाबत लाइफ जॅकेट वगैरेंसारख्या सुविधांबाबत थोडं अधिक जागरूक राहावं लागतं एवढंच. या खेळांची गरज नसेल आणि फक्त समुद्रकिनाऱ्यावर पहुडल्या पहुडल्या समुद्राची गाज ऐकायची असेल, तर हर्णै रस्त्यावरचाच निवांत पाळंदे गावातला किनाराही उत्तम. थोडं जास्त निवांत व्हायचं असेल, शहराच्या जवळ राहूनच जगापासून वेगळं असण्याचा आनंद अनुभवायचा असेल, तर मात्र सरळ लाडघर गाठावं. 

दापोलीहून बुरोंडी रस्त्याला लागलं, की लाडघरचा फाटा लागतो. स्वतःची गाडी असेल, तर थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचता येतं. बसने जायचं, तर थोडी पायवाट तुडवावी लागते. लाडघर ही अगदी छोटी, इतर ठिकाणांपासून वेगळी असलेली टुमदार वाडी आहे. इथे पर्यटकांच्या सुखसोयींनी सुसज्ज हॉटेलं, रिसॉर्ट, सगळं काही आहे. त्याशिवाय विस्तीर्ण आणि मनमोहक समुद्रकिनारा आहे. इथे किनाऱ्याशेजारीच हॉटेल्स असल्यामुळे आणि वाहनांची जास्त वर्दळही नसल्यामुळे रात्रीच्या टिपूर चांदण्यातही समुद्राच्या किनारी बसून त्याची गाज ऐकताना हरवून जायला होतं. लाडघरजवळच परशुरामाचं मंदिरही पाहण्यासारखं आहे. आणखी वेळ हाताशी असेल, तर दापोलीजवळ पन्हाळेकाझी लेणी आणि उन्हवरे येथील गरम पाण्याची कुंडंही अवश्य भेट देण्यासारखी.

आंजर्ल्याच्या कड्यावरच्या गणपतीला जायला पूर्वी हर्णैच्या पुढे होडीने जावं लागायचं. तिथून काही अंतर चालत जाऊन डोंगर चढून कड्यावरच्या गणपतीपर्यंत पोहोचता येत होतं. आता पूल झाल्यापासून गाडी थेट देवळापर्यंत जाते. तरीही होडीचा प्रवास करून जायचं असेल, तर तो आनंदही घेता येणं शक्य आहे. दापोलीचा हा निसर्गसोहळा एकदा तरी तब्येतीत अनुभवायला हवाच!
 
आसूदबागला जाण्यासाठी : दापोलीला जाण्यासाठी मुंबई-पुण्याहून खोपोलीमार्गे, पुण्याहून ताम्हिणी, भोरमार्गे रस्ता आहे. दापोली शहरातून मुरुड-हर्णै रस्त्याला सुमारे पाच किलोमीटर अंतरावर दाबकेवाडीला जाण्याचा फाटा आहे. दाबकेवाडीपर्यंत गाडी जाते. तिथून केशवराजची पायवाट सुरू होते. पायवाटेवरून देवळापर्यंत जाण्याचा रस्ता सुमारे ३० ते ४० मिनिटांचा आहे.

- अभिजित पेंढारकर
ई-मेल : abhi.pendharkar@gmail.com

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)

(‘चला, भटकू या’ हे सदर दर बुधवारी प्रसिद्ध होईल.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZPWBB
Similar Posts
रमणीय रत्नागिरी जिल्हा - भाग पाच (दापोली परिसर) ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण वाशिष्ठी नदीच्या दक्षिण तीरावरील गुहागर व चिपळूण तालुक्यातील पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या वाशिष्ठीच्या उत्तर तीरावरील दापोली परिसरातील काही निसर्गरम्य ठिकाणे.
गर्द झाडीतलं, निर्मळ कोळिसरे गणपतीपुळ्याला अनेक जण जातात; पण त्याच मार्गावरचं कोळिसरे हे निसर्गाच्या कुशीत दडलेलं मंदिर आणि तिथला परिसर कुलदैवत नसलेल्या पर्यटकांच्या फारसा परिचयाचा नसतो. गणपतीपुळे आणि जयगडसह आवर्जून भेट द्यावी, असं हे ठिकाण. ‘चला, भटकू या’च्या आजच्या भागात कोळिसरे आणि परिसराचा फेरफटका...
रमणीय रत्नागिरी – भाग ६ (दापोली तालुका) ‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण रत्नागिरीच्या दापोली तालुक्याच्या किनारपट्टीवरचा उत्तर भाग पाहिला. आजच्या भागात पाहू या त्या तालुक्याच्या उर्वरित भागातील ठिकाणे...
रत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अश्मयुगीन कातळ-खोद-चित्रांचा ठेवा सापडला आहे. त्यांच्या जतनासाठी शोधकर्ते, तसेच स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या वारशाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. ऑस्ट्रियातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. एर्विन न्यूमायर आणि इंग्लंडमधील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language